शूलपाणीतील दहा दिवस: त्याग आणि सेवेचा खरा अनुभव
दहा डिसेंबर रोजी बडवाणी सोडल्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमेच्या सर्वात अवघड अशा शूलपाणीच्या झाडीत प्रवेश केला. वीस डिसेंबर रोजी गोराकॉलनीमध्ये पोहोचलो. एकूणच, सुमारे दहा दिवस आम्हाला हा अवघड टप्पा पार करण्यासाठी लागले. आजकाल लोक म्हणतात की रस्ते झाल्यामुळे शूलपाणीचा प्रवास सोपा झाला आहे, पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. रस्त्याने जायचे झाल्यास एखाद्या ठिकाणी पोहोचायला पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते, तर पायवाटेने तोच टप्पा एका किलोमीटरमध्ये पार करता येतो. रस्त्यांमधील चढ-उतार आहेतच. त्यामुळे शूलपाणीचा प्रवास आजही तसा अवघडच आहे.
शिवाय, या भागात फार मोजके आश्रम आहेत. राहण्याची सोय नीट होईलच असे नाही, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. या भागातील नागरिकांमध्ये परिक्रमावासींविषयी प्रचंड आपुलकी असली तरी त्यांचे दारिद्र्य सेवा करण्यामध्ये मोठी आडकाठी ठरते. असे असले तरी, ते वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दाराशी आलेल्या परिक्रमावासीला जे असेल ते खायला घालतात.
या प्रवासातील काही अनुभव मनाला स्पर्श करणारे होते. एक खडा डोंगर चढून गेल्यानंतर डोंगर माथ्यावर एकच घर होते. बाहेर एक चटई टाकली होती आणि काही परिक्रमावासी तिथे थांबले होते. आम्हीही थांबलो. बाहेर दोन लहान मुले खेळत होती, एक अडीच-तीन वर्षांचे आणि दुसरे चार-पाच वर्षांचे. घरातून एक माई तांब्यात काळा चहा घेऊन आली. तिने सर्वांना चहा दिला. ती आमच्याशी बोलत थांबली. समोर एक छोटेसे मंदिराच्या घुमटीसारखे बांधकाम अर्धवट अवस्थेत होते.
मी सहज विचारले, 'हे मंदिराचे बांधकाम आहे का?'
त्यावर ती म्हणाली, 'नाही, माझ्या पतीची समाधी आहे.'
तिच्या पतीचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. ती दोन लहान मुले तिचीच होती. समोर असलेल्या एकरभर मक्यावर त्या तिघांना जगावे लागणार होते. तशाही अवस्थेत ती परिक्रमावासींची सेवा करत होती. जवळपास एकही घर नव्हते, शेजारी कोणी नव्हते. फक्त ती आणि तिची दोन लहान मुले. हा अनुभव पाहून मन हेलावून गेले.
शूलपाणीच्या झाडीत खूप जुना आश्रम अशी ख्याती असलेल्या फोदल्या गारदा पावरी यांच्या आश्रमात आमचा मुक्काम झाला. एक छोटेसे घर आणि त्यापुढे कुडाचे एक छोटेसे छप्पर म्हणजे तो आश्रम. आम्ही पोहोचलो तेव्हा सायंकाळ होत आली होती आणि आधीच आश्रमात गर्दी होती. फोदल्या पावरी आजारी होते. त्यांचा जीर्ण झालेला देह एका खाटेवर विसावला होता. दम्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यांना थंडी वाजू नये म्हणून त्यांच्या खाटेशेजारी मोठे ओंडके पेटवून धुनी पेटवून ठेवली होती, पण कुडाच्या भिंतींना असलेल्या फटीतून येणारा गार वारा त्यांच्या कष्टात अधिकच भर घालत होता.
रात्री खिचडीची भोजनप्रसादी मिळाली. त्यानंतर आम्ही अंथरुणावर विसावलो. तेवढ्यात फोदल्या पावरी यांची बहीण आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले. भावाची स्थिती पाहून बहिणीला अश्रू आवरले नाहीत. रात्री उशिरा ते सर्व निघून गेले. या सर्व गोष्टींचा विचार करता करता मला कधीतरी झोप लागली.
आश्रमाबाहेर ट्रॅक्टरने ओढून आणलेला पाण्याचा टँकर भरून ठेवला होता. त्या पाण्याने सकाळी स्नान करून आम्ही पुढे निघालो. खडा डोंगर चढून वर आलो. दमछाक झाली होती. वाटेत एक पंधरा-सोळा वर्षांची मुलगी पाण्याची कळशी घेऊन बसली होती. डोंगर चढून आलेल्या परिक्रमावासींना ती पाणी पाजत होती. तिला सहज विचारले, 'पाणी कुठून आणलेस?' तर तिने किमान दोन किलोमीटर अंतरावरून ते पाणी आणले असल्याचे समजले. तिला अक्षरशः साष्टांग नमस्कार करावा असे वाटले. आम्हा परिक्रमावासींपेक्षाही खरी पुण्यवान तीच होती.
शूलपाणीचे जंगल आता जंगल राहिलेले नाही. उघडे-बोडके डोंगर आणि प्रचंड चढ-उतार, अवघड वाटा असा हा सारा परिसर आहे. १३ डिसेंबर रोजी सकाळी आम्ही मध्यप्रदेशातील भादलमध्ये नक्करसिंग सोलंकी यांच्याकडे बालभोग घेतला. तिथून पुढे निघून महाराष्ट्रातील भादलमध्ये असलेल्या काळुराम वर्मा यांच्या आश्रमात रात्री मुक्काम केला. आम्ही खप्परमाळ येथे श्री उत्तम सेवाधाम या आश्रमात दुपारी बारा वाजता पोहोचलो. महर्षी उत्तम यांनी हा आश्रम उभारल्यामुळे परिक्रमावासींची सोय झाली आहे. दुपारी बारा वाजता या आश्रमात सोसाट्याचा वारा आणि कडाक्याची थंडी होती. भोजनप्रसादीला थोडा वेळ होता, त्यामुळे आम्ही तिथे थांबलो. या आश्रमात बाजूच्या वस्तीमधील छोट्या मुलांना शिक्षण दिले जाते आणि भोजनही दिले जाते. हा उपक्रम अतिशय चांगला आहे.
दुपारी भोजनप्रसादी घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो. डोंगर उतरून खाली येईपर्यंत अंधार होऊ लागला होता. मग भमाणा येथे रस्त्याच्या कडेला एका घरात आश्रय घेतला. हे घर कालशा पावरा यांचे. त्यांची पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा संसार होता. फॉरेस्टच्या हद्दीत नदीकिनारी असलेल्या दोन-अडीच एकरावर मका वगैरे जे काही पिकेल त्यावर वर्षभर गुजराण करावी लागते.
आम्ही येथे पोहोचलो, तेवढ्यात तिथे एक माई आणि एक तरुण परिक्रमावासी मुलगा आले. त्या माई म्हणजे पुण्याच्या पोलीस खात्यात असलेल्या अर्चना काळे. त्यांचा पहिल्यांदा परिचय तिथे झाला. आम्ही पुण्याकडचे म्हटल्यावर आणि आमच्यासोबत सत्संगी महाराज पूर्वाश्रमीचे पोलीस इन्स्पेक्टर असल्याने आमच्यात छान गप्पा झाल्या. अर्चनाताईंनी परिक्रमेसाठी ९० दिवसांची रजा घेतली होती. त्यांनी चहा घेतला आणि त्या इथे मुक्कामाला न थांबता पुढे निघून गेल्या.
आम्ही मात्र कालशा पावरा यांच्याकडेच थांबलो. सायंपूजा आटोपली. तेव्हा पावरा यांनी भोजनात कांदा-लसूण चालेल का, असा प्रश्न केला. मुळातच एवढी गरिबी आणि ते अशाही अवस्थेत आमची सेवा करू पाहत असल्यामुळे आम्ही त्यांना, 'तुम्हाला जे शक्य होईल ते द्या, आम्ही ते मैयाचा प्रसाद म्हणून ग्रहण करू,' असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कांदा-लसूणविरहित तुरीच्या डाळीची आमटी आणि मक्याच्या गरमागरम भाकरी असे भोजन आम्हाला दिले. नवले महाराजांनी 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून कालशा पावरा यांना यथाशक्ती मदत केली.
दुसऱ्या दिवशी तिथून निघून आम्ही बिलगाव उंबरपाणी येथे नर्मदा निरंजनी गोरक्षनाथ धुना फाउंडेशनच्या आश्रमात पोहोचलो. १६ डिसेंबरला धनाजे येथील श्री नर्मदा शंकर आश्रमात थोडा वेळ आराम करून सायंकाळी धडगाव येथे पोहोचलो. तिथे एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली. पण ती सांगतो पुढच्या भागात.
Marathi literature, spiritual journey, Narmada Parikrama, travelogue, personal narrative, divine connection, selfless service, human spirit, Shulpani jungle
#NarmadaParikrama #SpiritualJourney #MarathiLiterature #Shulpani #SelflessService #HumanSpirit #Pilgrimage #DevotionalStory #ActsOfKindness #NarmadaMaiya
------------------------------





